स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सन 1900 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला नॉर्मन प्रिचर्ड यांनी 200 मीटर धावणे या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये रौप्यपदक मिळवून दिले. पण नॉर्मन प्रिचर्ड हे भारतीय नागरिक नव्हते. ब्रिटिश इंडियन ॲथलिट म्हणून ते या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे भारताला जरी या स्पर्धेत पदक मिळाले असले तरी ते परदेशी नागरिकाकडून मिळालेले पदक होते.
1952 साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने भारताला पहिले वैयक्तिक क्रीडा प्रकारामधील पदक मिळाले. खाशाबा जाधव यांनी कुस्ती (फ्री स्टाइल) या क्रीडाप्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिले. त्याआधी खाशाबा 1948 लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाले होते. पण दुर्दैवाने मॅटवर खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे आणि प्रशिक्षणाच्या कमतरतेमुळे त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे राजे शहाजी दुसरे यांनी खाशाबांना आर्थिक पाठबळ दिले होते. खाशाबा त्यांच्या पायात अत्यंत चपळ होते, ज्यामुळे ते त्यांच्या काळातील इतर कुस्तीपटूंपेक्षा वेगळे होते. खाशाबांनी प्रशिक्षणादरम्यान स्वतः मध्ये असलेले हे सर्व गुण हेरले आणि 1952 च्या ऑलिम्पिक खेळांपूर्वी कठोर परिश्रम घेतले.
1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्राथमिक फेऱ्या जिंकल्यानंतर सेमीफायनलमध्ये खाशाबांची गाठ सोवियत युनियनच्या खेळाडूशी होती. सेमीफायनलची कुस्ती खाशाबांची कॉर्टरफायनलची कुस्ती झाल्यावर लगेचच झाली. तांत्रिकदृष्ट्या दोन कुस्त्यांमध्ये मध्ये कमीत कमी 30 मिनिटाचा विश्रांतीचा कालावधी असतो. या नियमाप्रमाणे कॉटरफायनल ची कुस्ती झाल्यानंतर खाशाबांना 30 मिनिटाचा विश्रांती कालावधी मिळणे आवश्यक होते. पण कॉर्टरफायनलची अत्यंत चुरशीची कुस्ती झाल्यावर लगेचच त्यांना सोवियत युनियनच्या खेळाडू बरोबर सेमीफायनलची कुस्ती खेळावी लागली. खाशाबांनी त्यास नकार दिला. पण दुर्दैवाने ही तांत्रिक बाजू मांडण्यासाठी भारताचा एकही ऑफिशियल त्याठिकाणी हजर नव्हता. त्यामुळे सलग कुस्त्या खेळून दमलेल्या खाशाबांना लगेचच सेमीफायनलची कुस्ती खेळावी लागली. यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि भारताला स्वातंत्र्यानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारात मिळालेल्या पहिल्यावहिल्या कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणेच खाशाबांना त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले. पोलीस दलातून रिटायर झाल्यानंतर पेन्शन साठी त्यांना खूप झगडावे लागले. ज्या खेळाडुने भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले त्या खेळाडूचा भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला विसर पडल्यामुळे त्यांच्या हयात त्यांना एकही क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नाही. 1984 साली एका रोड एक्सीडेंट मध्ये त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com
Comments
Post a Comment