मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली.
वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला होता. तोच आत्मविश्वास 1983 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात वेस्टइंडीजच्या संघाला पराभूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. भारतीय संघामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्वाचे काम कपिल देव यांच्यातील नेतृत्वाने केले होते.
या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी झिंबाब्वे संघाविरुद्ध त्यांनी 138 बॉलमध्ये केलेली 175 धावांची अविस्मरणीय खेळी आणि या स्वतःच्या खेळीवर प्रभावित होऊन स्वतःसाठी बक्षीस म्हणून मर्सिडीज कार बुक करणारा हा खेळाडू सर्व संघासाठी नवीन आदर्श निर्माण करणारा होता. वेस्टइंडीज बरोबरच्या अंतिम सामन्यात कपिल देव यांनी विव रीचर्डस यांचा डीप स्क्वेअर लेगला पळत जाऊन पाठमोरा पकडलेला अवघड कॅच सामन्याला कलाटणी देणारा ठरला आणि भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले. बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग या सर्व बाबीत स्वतः उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी भारतीय संघात एक नवीन ऊर्जा निर्माण केली होती. 'लीडींग फ्रॉम दि फ्रंट' असे त्यांचे नेतृत्व होते.
1987 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 268 धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी झाल्यानंतर कपिल देव यांनी अंपायरना सांगून ऑस्ट्रेलियाच्या 268 धावांमध्ये दोन धावा वाढविण्याची विनंती केली आणि एकूण 270 धावा नोंद करण्यास सांगितले. याचे कारण म्हणजे सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूने मारलेला षटकार अंपायरनी चुकून चौकार दिला होता. या सामन्यात भारताने फलंदाजी करताना 269 धावा केल्या आणि भारत फक्त एका धावेने पराभूत झाले. जर कपिल देव यांनी त्या दोन धावा वाढविण्यास सांगितले नसते तर भारत त्या सामन्यात विजय झाला असता. पण कपिल देव यांनी असे न करता खिलाडूवृत्ती दाखवली जी खेळासाठी आणि खेळातील नैतिकता टिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती.
कसोटी क्रिकेटमध्ये 434 विकेट्स घेऊन त्यांनी रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला. पुढे 2000 साली कर्टनी वॉल्श यांनी कपिल देव यांचा हा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये चारशे विकेट घेणारा आणि पाच हजार धावा करणारा हा जगातील एकमेव अष्टपैलू खेळाडू 1994 साली क्रिकेटमधून निवृत्त झाला.
प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
Comments
Post a Comment