आधुनिक ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात 1896 साली झाली. अथेन्समधील पॅनाथेनाइको स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या खेळांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 14 देशातील 241 खेळाडू सहभागी झाले आणि त्यांनी 43 क्रीडा प्रकारांसाठी एकमेकांबरोबर स्पर्धा केली. फ्रेंच शिक्षक बॅरोन पियर दि कुबर्टिन यांना आधुनिक ओलंपिकचे जनक असे संबोधले जाते. त्यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची बांधणी झाली आणि आधुनिक ऑलम्पिक स्पर्धेची सुरुवात होण्यास मदत झाली.
दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. पहिल्या महायुद्धाच्या कारणामुळे 1916 साली आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामुळे 1940 आणि 1944 साली या स्पर्धा झाल्या नाहीत. पण त्यानंतर या स्पर्धेमध्ये कधीही खंड पडलेला नाही.
Citius-Altius-Fortius म्हणजेच अधिक वेगवान, अधिक उंच आणि अधिक बलवान हे ऑलिंपिकचे बोधवाक्य आहे. जगातील सर्व देशातील खेळाडूंनी एकत्र येऊन स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक एकात्मता व बंधुता वाढवावी, व्यक्तिमत्व आणि शारीरिक सक्षमता विकसित करावी, देशभक्तीची भावना वाढावी आणि स्पर्धेच्या माध्यमातून शारीरिक शिक्षण आणि खेळ यांचा विविध देशात प्रसार वाढवणे हा आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचा मुख्य उद्देश आहे.
युरोप,आफ्रिका,आशिया,ओशियाना आणि अमेरिका या पाच प्रातिनिधिक खंडांना एकमेकांमध्ये एकतेच्या आणि बंधुतेच्या माध्यमातून एकमेकांमध्ये कायम गुंफून ठेवणे आणि त्या माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करणे हा सुद्धा ऑलम्पिक चळवळीचा एक उद्देश आहे.
बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण, स्पर्धेमध्ये होणारा उत्तेजित द्रव्यांचा वापर, वंशभेद, स्त्री-पुरुषांमधील भेदभाव, युद्ध आणि अतिरेकी हल्ला अशा विविध कारणांमुळे काही देशांनी काही वेळेला स्पर्धेवर बहिष्कार टाकला. तरीसुद्धा या सर्व अडथळ्यांवर मात करत आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.
प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com
Comments
Post a Comment