1952 हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला खाशाबा जाधव यांच्या रूपाने कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिले पदक मिळाले. यानंतर जवळजवळ चार दशके म्हणजेच 1996 च्या अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत भारताला कोणत्याही वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पदक मिळाले नाही. अनेक युरोपियन, लॅटिन अमेरिकन देश या काळात क्रीडा क्षेत्रात प्रगतीपथावर गेले. पण भारताचा हॉकी वगळता इतर खेळात असलेला पदकांचा दुष्काळ कायम राहिला. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ एकविसाव्या शतकाच्या उदयापर्यंत भारतीय क्रीडाक्षेत्रात उदासीनताच दिसून आली.
स्वातंत्र्यानंतर पुढच्या पन्नास वर्षांमध्ये काही महत्त्वाच्या कारणांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात विविध संस्थाने खालसा करण्यासाठी झालेला संघर्ष, 1962 चीन युद्ध, 1965 पाकिस्तान युद्ध, 1971 बांगलादेश मुक्तीयुद्ध यामुळे या दशकांमध्ये क्रीडा क्षेत्राची पीछेहाट झाली. देशावर पडत असलेल्या अतिरिक्त आर्थिक भार यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करता आली नाही.
1983 साली भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर क्रिकेट हा जणू भारताचा राष्ट्रीय खेळ होऊन गेला. क्रिकेटचे साहित्य सहजासहजी उपलब्ध होत होते. बॉल, बॅट आणि स्टंप एवढ्या कमी साहित्यात अनेक जण एकावेळी हा खेळ खेळू शकत होते. क्रिकेटच्या क्रेझ मुळे सहाजिकच इतर खेळांकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. क्रिकेटमुळे खेळाडूंना पैसे मिळू लागले, प्रसिद्धी मिळू लागली. त्यामुळे इतर खेळांमध्ये करियर करण्यापेक्षा क्रिकेटमध्ये करिअर केल्यास जास्त पैसे मिळतील, जास्त प्रसिद्धी होईल असा समज समाजामध्ये तयार झाला. जशी क्रिकेटमध्ये पैशाची इन्वेस्टमेंट झाली तशी इतर खेळांमध्ये झाली नाही. ऍडव्हर्टाईस, स्पॉन्सरशिपमुळे क्रिकेटर श्रीमंत होत गेले. इतर खेळांमध्ये इतका पैसा नसल्यामुळे सहाजिकच प्रत्येकाची पावले क्रिकेट कडे वळू लागली. भारतात क्रीडा संस्कृती रुजण्यासाठी हे वातावरण खूपच घातक होते.
जसे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रतीचे क्रीडासाहित्य उपलब्ध होत होते तसे इतर खेळातील क्रीडा साहित्य उपलब्ध होत नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविण्यासाठी अतिऊच्च दर्जाचे क्रीडा साहित्य असणे अत्यंत आवश्यक असते, जे भारतात सहज उपलब्ध होत नव्हते. क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयश येण्याचे हे मुख्य कारण होते.
1996 च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये लिअँडर पेसने भारताला पुन्हा एकदा टेनिस या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये देशाला कांस्य पदक मिळवून दिले. त्यानंतर खऱ्या अर्थाने भारत सरकारने आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा संघटनांनी पारंपारिक क्रीडा प्रणालीमध्ये बदल केला. स्पोर्ट्स पॉलिसी तयार करण्यात आली. क्रिकेटसारखाच इतर खेळांमध्ये सुद्धा पैसा आला. साहित्य-साधने उपलब्ध होऊ लागली. स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स फिजिओलॉजी, स्पोर्ट्स जेनेटिक्स, स्पोर्टस सायकॉलॉजी इ. सारख्या विषयांमध्ये प्रगती होत गेली. भारतीय क्रीडाक्षेत्रात संशोधनामध्ये मध्ये वाढ झाली. खेळाडूंना खाजगी कंपन्यांकडून स्कॉलरशिप, स्पॉन्सरशिप मिळू लागल्या. भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खेळाडूंना खेळ देण्यात येऊ लागले. भारतीय सेना सुद्धा यात मागे नव्हती. आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट आणि आर्मी बॉईजच्या माध्यमातून लहान वयातच खेळाडूंना भरती करून घेतले जाते आणि तंत्रशुद्ध आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.
नवीन क्रीडा प्रणालीचा भाग म्हणून खेलो इंडिया यासारखी नवीन स्पर्धा पुढे आली. वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्याची संधी खेलो इंडियाच्या माध्यमातून प्राप्त झाली. पुन्हा एकदा भारताला वैयक्तिक खेळांमध्ये पदके मिळू लागली. लिअँडर पेस, कर्णाम मल्लेश्वरी, राजवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा यांनी केलेली सुरुवात नीरज चोप्राच्या 2020 टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदकापर्यंत कायम आहे. सध्या भारत क्रीडाक्षेत्रातील महासत्ता नसला तरी चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या क्रीडाक्षेत्रातील महासत्तांना टक्कर देण्याची क्षमता आपल्यामध्ये नक्कीच तयार झालेली आहे.
प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com
Comments
Post a Comment