Skip to main content

लिओनल मेस्सी

 


फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल डीऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी. 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले. फक्त कमी होती ती विश्वचषकाची. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सीने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली. फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता. पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला. विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सीची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली. त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे. घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली. तो स्थानिक क्लबकडून खेळू लागला. पण वयाच्या अकराव्या वर्षी त्याच्यामध्ये शारीरिक वाढ होण्यासाठी आवश्यक हार्मोनची कमतरता दिसून आली. त्याच्या उपचाराचा खर्च कुटुंबियांना परवडणारा नव्हता त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. याच दरम्यान ब्युनास आयर्स येथील रिवरप्लेट क्लबने मेस्सीचा खेळ बघून त्याला आपल्या क्लब मध्ये घेतले पण त्याच्या उपचाराचा खर्च क्लबला सुद्धा परवडणारा नव्हता. 2000 मध्ये मेस्सीच्या कुटुंबियांनी स्पेनला जाऊन बार्सिलोना फुटबॉल क्लबने आयोजित केलेल्या निवड चाचणीसाठी मेस्सीला उतरण्याचा निर्णय घेतला. बार्सिलोनाचे तत्कालीन स्पोर्टिंग डायरेक्टर कार्ल्स रेक्सच हे मेस्सीच्या खेळाने प्रभावित झाले आणि त्यांनी लागलीच मेस्सीला बार्सिलोनाच्या युथ टीमसाठी कराराबद्ध करण्याचे ठरवले. आश्चर्याची बाब म्हणजे कागद उपलब्ध नसल्यामुळे कार्ल्स रेक्सच यांनी पेपर नॅपकिनवर करारातील मुद्दे लिहीत त्यावर सह्या केल्या आणि मेस्सी बार्सिलोना युथ टीमसाठी करारबद्ध झाला. बार्सिलोना क्लबने त्याचा उपचाराचा सर्व खर्च उचलला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्यावरील उपचार पूर्ण झाले आणि तो ग्रोथ हार्मोन कमतरतेच्या आजारातून पूर्णपणे बरा झाला. जगाला लिओनल मेस्सी देण्यामध्ये बार्सिलोना फुटबॉल क्लबचा खूप मोठा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यानंतर त्याने आपली कारकीर्द बार्सिलोनासाठी सुरू केली आणि
वयाच्या 24 व्या वर्षी बार्सिलोनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. 2000 ते 2005 पर्यंत तो बार्सिलोनाच्या युथ क्लब, बार्सिलोना सी आणि बार्सिलोना बी संघांसाठी खेळला. 2004 मध्ये त्याने बार्सिलोना मुख्य संघात प्रवेश केला आणि त्याची व्यावसायिक फुटबॉल कारकीर्द सुरू झाली. पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत त्याने बार्सिलोनाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. स्पॅनिश ला लीगा या स्पॅनिश लीग विजेतेपदाबरोबरच बार्सिलोनासाठी अनेक अजिंक्यपद मिळवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. रोनाल्डिन्हो, नेमार, इनिएस्ता, डेको, थीएरी हेनरी यासारख्या अनेक नामवंत खेळाडूंची साथ त्याला बार्सिलोनाकडून खेळताना मिळाली. 2021-22 या सिझनसाठी तो पॅरिस सेंट जर्मन या फ्रेंच क्लबसाठी करारबद्ध झाला. व्यावसायिक फुटबॉलच्या कारकिर्दीत त्याने मधील जवळजवळ सर्वच किताब पटकावले आहेत.

2005 साली मेस्सीने अर्जेंटिनासाठी आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली. त्याचा पदार्पणाचा सामना फक्त 47 सेकंदाचा राहिला. हंगेरी विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये त्याला सब्स्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानावर पाठवण्यात आले, पण 47 सेकंदातच त्याला रेड कार्ड मिळाल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. बार्सिलोनाप्रमाणेच आपल्या देशालासुद्धा विविध स्पर्धेत विजेतेपद मिळवून देत मैदानावरच्या देशसेवेची कामगिरी चोखपणे बजावली. 2016 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेवेळी चिली विरुद्ध अंतिम सामना गमावल्यानंतर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला विराम देत निवृत्ती जाहीर केली. सलग तीन कोपा अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयश आले होते. याचे शल्य मनात असल्यामुळे त्याने निवृत्ती जाहीर केली. पण फुटबॉलप्रति आणि देशाप्रती असलेले प्रेम त्याला 2018 च्या विश्वचषक पात्रता फेरीसाठी पुन्हा मैदानावर घेऊन आले. 2018 विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्स काढून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण या लढवय्या खेळाडूने 2022 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवत अर्जेंटिनाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.

संपूर्ण कारकिर्दीत मेस्सीची तुलना अनेक महान खेळाडून बरोबर झाली. मेस्सी उंचीने लहान आणि शरीरयष्टीने किरकोळ असूनसुद्धा आपल्या जादुई खेळाच्या जोरावर त्याने त्याचे फुटबॉल मधील कर्तुत्व सिद्ध केले. त्याच्या पिढीतील महान खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याच्यामध्ये नेहमीच चढाओढ पाहायला मिळाली. अतिशय शांत, संयमी आणि फुटबॉलप्रति समर्पित हा खेळाडू कधीही वादाच्या भोवऱ्यात सापडला नाही. मेस्सी फक्त सर्वोत्तम स्ट्रायकरच नव्हता तर सर्वोत्तम कर्णधार सुद्धा होता. नेदरलँडबरोबरच्या पेनल्टी शूटआउटमध्ये शेवटच्या पेनल्टी किकवर विजय मिळवल्यानंतर त्याच्या संघातील सर्व खेळाडूंनी गोल करणाऱ्या खेळाडूकडे धाव घेतली पण मेस्सीने मात्र या ट्रायब्रेकर मध्ये नेदरलॅंडचे दोन पेनल्टी अडवणाऱ्या गोलकीपर मार्टिनीज याच्याकडे धाव घेत या विजयातील गोलकीपरचे महत्व अधोरेखित केले. मेस्सीने नेहमीच संघभावना आणि सांघिक कामगिरी याला महत्व दिले.

खरतर यशाच्या शिखरावर असताना निवृत्त झाले तर त्या खेळाडूचा आदर सन्मान टिकून राहतो. अनेक महान खेळाडूंनी त्यांच्या यशाच्या शिखरावर असताना निवृत्ती स्वीकारलेली आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर मेस्सीने निवृत्ती जाहीर करेल असे सर्वांनाच वाटले होते. पण त्याने तसे केलेली नाही. कदाचित त्याने भविष्यातील त्याच्या कारकिर्दीविषयी नक्कीच विचार केला असणार. कदाचित त्याच्यातील शिल्लक असलेले फूटबॉलने त्याला निवृत्तीच्या निर्णयापासून रोखले असेल. त्यामुळे अजून काही काल सर्वांनाच त्याचा खेळ अनुभवयास मिळेल. हा महान खेळाडू कधीही निवृत्त झाला तरी साऱ्या विश्वातील फुटबॉल प्रेमींसाठी तो कायम महान राहील.

Comments

Popular posts from this blog

फ्लाइंग सिख - मिल्खा सिंग

जगाच्या क्रीडा व्यासपिठावर भारताची दखल घेण्यास भाग पाडणारे ॲथलिट म्हणून मिल्खा सिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यावेळी वेगवान धावपटू मिल्खासिंग यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे साऱ्या जगाची भारतीय क्रीडाक्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली. संपूर्ण क्रीडाक्षेत्रात एक सच्चा देशभक्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 'भाग मिल्खा भाग' हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपणास आपणा सर्वांना माहीत आहेच. 1947 देशाच्या फाळणी वेळी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या सर्व कुटुंबीयांची डोळ्यादेखत झालेली हत्या ही भयानक आठवणी घेऊन ते स्वतःचा जीव वाचवत दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले. एक ग्लास दुधासाठी ते सेनादलातर्फे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि भारताला धावपटूच्या स्वरूपात एक हिरा मिळाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी 200 मी. आणि 400 मी. धावण्यामध्ये अत्यंत कमी कालावधीत प्राविण्य मिळविले. 1954 ते 1964 दरम्यान आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अज...

भारतीय क्रिकेटचा बादशाह - कपिल देव

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली.  वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला ...